७ सप्टेंबर, २०१३

भामटा


वैशिष्ट्‌यपूर्ण आहे एकेक भामटा;
तो साव भामटा अन् हा नेक भामटा.



जनतेस भाकरीने खाऊन टाकले;
खुर्चीत खात आहे पण केक भामटा.



ज्याने न कापसाचे विकलेत बोंडही;
वटवून घेत आहे तो चेक भामटा.



ज्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो;
देवास घालतो पण अभिषेक भामटा.



विश्वास नाव ह्याचे हा तज्ज्ञ घातकी;
स्नेहातही करी जो अतिरेक भामटा.



गावास आग लावी,देशासही कधी;
लागू न दे स्वत:ला पण शेक भामटा!



राज्यात कोतवाली त्यालाच लाभते;
लाचेत देत आहे जो लेक भामटा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा