७ सप्टेंबर, २०१३

झेंडा



अस्वस्थ एक आत्मा सांगून जात आहे;
अद्याप माणसाला माणूस खात आहे.

बाहेर एकमेका सौजन्य दाखवा रे;
आतून सज्ज सारा विश्वासघात आहे.

चोरून सर्व पोळ्या कुत्रे पळून गेले;
जेवा खुशाल आता उष्टाच भात आहे.

जगतो तरी कशाला कंदील फ़ोडलेला?
त्याच्या उरात नक्की पेटून वात आहे!

स्तोत्रे कशीच वाचू मी तृप्त ढेकरांची;
अडकून घास अर्धा माझ्या घशात आहे.

फाटून नष्ट झाला मागे कधीच झेंडा;
हा उंच भीकमाग्या नुसताच हात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा