५ सप्टेंबर, २०१३

अनुवाद

बांधून टाकलेली आहे जरी हवा ही;
उच्चार वादळाचा तो थांबणार नाही.

वारूळ शोधणा-या मुंग्या पुढे निघाल्या;
वाटेत पर्वतांनी केली जरी मनाई.

हुंकार देत आहे काळोख भोवताली;
सांभाळ रे दिव्या तू रंगीत रोशणाई.

जिव्हा विकून तोंडे बसली जरी मुक्याने;
दौतीत कोणत्याही नाही गहाण शाई.

खाऊन घे गिधाडा तू एक प्रेत माझे;
अनुवाद भाकरीचा चालू  दिशात दाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा