७ सप्टेंबर, २०१३

सर्व


तापतो आत लाव्हारसासारखा;
सांग मी शांत राहू कसा सारखा ?

योजना आखुनी जाळतो का मला ?
भ्रष्ट ना मी तुझ्या कापसासारखा.

सांग सोडू कसा आज पाण्या तुला ?
कोरडा होत आहे घसा सारखा.

औळखा तेच हे दिव्य मारेकरी;
त्या बुटांचा बघा हा ठसा सारखा.

पूर देतो कुणा, थेंबही ना कुणा;
धूर्त झालास तू पावसासारखा.

मार्ग काहीतरी काढ यातून रे;
हार मानू नको तू असा सारखा.

सोबतीचे जरी सर्व झाले पशू;
तू तरी वागना माणसासारखा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा