जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले;
हे वृत्त आज आले की ते मरून गेले.
नावा किती बुडाल्या त्याचा हिशेब नाही;
पण दीपस्तंभ सारे सागर तरून गेले.
गावात पापण्यांचा दुष्काळ कोरडा हा-
वाटे जरी रडावे अश्रू सरून गेले.
हा चेहरा तुझाही मळकाच वाटतो रे;
आयुष्य का तुझेही ते वापरून गेले.
वेगात खूप तूही वाहू नकोस वा-या;
फाटेल आणखी हे लक्तर विरून गेले.
मेंदूस सर्व त्यांच्या झाला लगेच लकवा;
तुमचे विचारवारे ज्यांच्यावरून गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा