७ सप्टेंबर, २०१३

मंबाजी


मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालुनी विठू नेतात मंबाजी.



तुम्हाला हालता यावे, न साधे बोलता यावे;
पवित्रे टाकुनी ऐसे धरी पेचात मंबाजी.



कुमारी पाहिजे कन्या,तशी चालेल प्रौढाही;
असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी.



मला भंडावती येथे,तुलाही गांजती तेथे;
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी.



अहो ज्ञानेश्वरा, टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला;
फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी.



तुकारामा,अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा