९ सप्टेंबर, २०१३

आत्महत्या


आत्महत्या पाप आहे खूप झाले सांगणे;
पोट भरल्या चोचल्यांचे खूप झाले सांगणे.

बदलतो आहे ऋतू, तू पेरणी बदलून घे;
कोरड्या ठण पावसाचे खूप झाले सांगणे.

फाटले आभाळ आता लाज मी झाकू कशी;
उमलत्या माझ्या कळीचे खूप झाले सांगणे.

सोड ताबा वावराचा; कर्ज नाही फेडले;
सावकारांच्या दुतांचे खूप झाले सांगणे.

सांग कोणाला स्वत:चा जीव नाही लाडका;
आज दोराला गळ्याचे खूप झाले सांगणे.

(असंग्रहीत/प्रसिद्धी : ‘देशोन्नत्ती’ दिवाळी अंक २००६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा