दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही;
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.
चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही.
आश्चर्य हे मला की झाली न ‘अहम’बाधा;
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही!
तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या तुला कधीही मिळणार मान नाही.
त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वत:ला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही.
(असंग्रहीत/प्रसिध्दी : ‘कविता-रती’ दिवाळी अंक २००५)