२ सप्टेंबर, २०१३

वरात


तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधूर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा